आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, कोकणात प्रत्येक चांगला व्यवसाय अनधिकृतपणे करावा लागतो. पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि मुद्दाम मी या विषयावर लिहित आहे.
अधिवेशन निमित्त आज हा खास लेख लिहीत आहे.
वीस वर्षांपूर्वी शून्य एक्साइज आणि सर्व प्रकारची सबसिडी शासनाची मदत उर्वरित महाराष्ट्र मध्ये द्राक्ष पासून वाईन निर्मितीची परवानगी मिळाली आणि पश्चिम महाराष्ट्र नाशिक मध्ये शेकडो वायनरी सुरू झाल्या. मात्र कोकणातील आंबा काजू चिकू करवंद जांभूळ यांच्यापासून वाईन करण्याकरता दुप्पट एक्साईज, छोट्या वाइनरींची कोकणाला गरज असताना एकाही ब्युटिक वायनरीला, किंव्हा मायक्रो वायनरीला गेल्या वीस वर्षात आजपर्यंत परवानगी मिळाली नाही. गेली सात आठ वर्ष कोकण क्लबचे वायनरी विभागाचे प्रमुख माधव महाजन मायक्रो वायनरीला परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. अजून मिळालेली नाही. आता सरकार आणि अधिकारी सकारात्मक आहेत त्यामुळे पुढील महिना दोन महिन्यात ती मिळेल अशी अपेक्षा आहे. अर्थात आता एक्साईज एका लिटरला एक रुपया इतका द्यावा लागणार आहे म्हणजे कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे शासनाचे आभार सुद्धा आम्ही व्यक्त करतो. पण परवानगी मिळावी आणि अजून शंभर उद्योजक कोकणात मायक्रो वायनरी स्वतःच्या पैशाने सुरू करायला तयार आहेत त्यांना युद्ध पातळीवर परवानगी मिळाव्यात.
केरळमध्ये एलेप्पीच्या एका खाडीवर दोन हजार हाऊसबोट आहेत. आणि किमान दोन-तीन हजार कोटीची अर्थव्यवस्था आहे. येथे जाणारे 40% पर्यटक महाराष्ट्रातील आणि विशेषता मुंबई पुण्यातील आहेत. कोकणात या लेवलच्या किमान दहा बॅकवॉटर आहेत. आजपर्यंत बॅकवॉटर टुरिझम आणि हाऊस बोट सुरू झाली नाही कारण अशा स्वरूपाचा व्यवसाय करायला कोकणात परवानगी दिली गेली नाही. यावर हिम्मत काढून कोकणातील दोन पर्यटन व्यवसायकांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी हाऊस बोट स्वतः कर्ज काढून सर्व प्रकारचे नियम पाळून सुरू केल्या. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे सर्व निकष फॉलो केले. तरीही दुर्दैवाने अजून त्यांना फायनल परवानगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने दिली नाही. या उद्योगाला जर सहजपणे परवानग्या दिल्या तर पुढच्या पाच वर्षांमध्ये कोकणात 5000 हाऊसबोट सुरू होतील आणि किमान दहा/ वीस हजार कोटीची अर्थव्यवस्था बॅकवॉटर टुरिझमच्या माध्यमातून उभारली जाईल. अडथळा एकच अधिकारी आणि अशा स्वरूपाचा चांगला व्यवसाय करायला सुद्धा परवानगी न देणे. याकरता आवश्यक असलेली पॉलिसी आणि सुटसुटीत नियम नसणे . या सरकारच्या कार्यकाळात परवानगी सहजपणे आता मिळतील अशी अपेक्षा आहे. पण मिळत नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे.
कोकणात शंभरहून अधिक समुद्रकिनारे आहेत, सागरी पर्यटनासाठी लोक केरळमध्ये जातात किंवा मॉरिशस मालदीव बाली फुकेत थायलंड मलेशिया मध्ये जातात. कोकणातले समुद्रकिनारे नीट विकसित केले तर किमान 50,000 कोटींची पर्यटनाची अर्थव्यवस्था उभी राहील. व कोकणातील एकाही धरणाला छोट्या नोकरीसाठी मुंबईत यावे लागणार नाही. हजारो कोकणी तरुणांना कोकणातच उद्योग सुरू करता येतील. अर्ध्या दापोली एवढा किंवा मालवण एवढा थायलंड मधील फुकेत याची अर्थव्यवस्था 25000 कोटीची आहे. पण हे कोकणात घडले नाही. पर्यटनाच्या नावाखाली समुद्रकिनारी झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत. कारण कोकणात समुद्रकिनाऱ्यावर अधिकृतपणे बांधकामे उभारण्यासाठी परवानगी दिली जात नाही असंख्य अडथळे आणले जातात, सीआरझेडची परवानगी काढायला चेन्नईच्या संस्थेकडे जावे लागते. एक शेतकरी किंवा कोकणातला युवक आपल्या एका पर्यटन प्रकल्पासाठी पाच-दहा लाख रुपये करून चेन्नई मधून परवानगी आणू शकत नाही. सी आर झेड क्लिअरन्स , mczma अधिकृतपणे कोकणातील समुद्र किनाऱ्यावर कोकणातील शेतकऱ्यांना किंवा तरुणांना आपल्या जागेत कॉटेजेस काढून शांतपणे व्यवसाय करता येत नाही परवानगी न मिळाल्यामुळे बँका कर्ज देत नाहीत आणि तरीही जिद्दीने कोकणातील तरुण कोकणात समुद्रकिनारी पर्यटन उद्योग विकसित करत आहेत पण हा उद्योग अनधिकृतपणे करावा लागतो "का ?"
आमचे म्हणणे नाही की अनधिकृत बांधकामे आम्हाला बांधायला द्या, आम्हाला अधिकृत परवानगी द्या सगळे नियम लावा सगळे निसर्गाचे पर्यावरणाचे देशात असलेले नियमाच्या अधीन राहून परवानगी द्या, परवानगी मिळाली तर बँकांकडून सुद्धा कर्ज मिळेल आणि सर्व नियम पाळून बांधकामे होतील आणि खऱ्या अर्थाने फुकेत सारखं किंवा बालीसारखं अतिशय दर्जेदार सागरी पर्यटन कोकणात विकसित होईल.
पण याकरता परवानगी दिली जात नाही, व्यवसाय अनधिकृत पणे असतील तर ब्लॅकमेलिंग करता येतं उद्योग उद्योजकांना त्रास देता येतो, त्यातून पुढे काय होते हे सगळ्यांनाच माहीत आहे.ही प्रशासकीय मानसिकता आहे. ही मूळ समस्या आहे आणि याच्या मुळाशी जायला कोणाला वेळ नाही.
कोकण विकासाचा असा एक एक विषय जातून हजारो कोटीची अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकेल पण या विषयाकरता परवानगीच द्यायची नाही हे शासकीय अधिकाऱ्यांचे आणि प्रशासनाचे धोरण. हे धोरण कधी बदलणार, आणि यासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती कधी कोकणात निर्माण होणार ?
यासारखे अनेक विषय आहेत कोकणात प्रत्येक चांगला व्यवसाय अनधिकृतपणे करावा लागतोय आणि तो केस स्टडी सकट मी या लेखांमध्ये मांडणार आहे. यावर कोकणातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सर्व पक्षाच्या राजकीय प्रमुखानी विचार करणे आवश्यक आहे.
कोकणातील गाव रिकामी का झाली ,कोकणात ग्रामीण स्तरावर रोजगार का निर्माण झाले नाही, कोकणातल्या तरुणांना कोकणातच काम का मिळत नाहीत, कोकणातील तरुण गाव सोडून मुंबई पुण्यात आणि बाहेर का जातात, या सगळ्या विषयावर आत्मचिंतन आणि आत्म मंथन होण्याची आवश्यकता आहे.
हा खूप मोठा विषय आहे त्यामुळे ही लेखमाला क्रमशः किमान तीन लेख या विषयावर मी लिहिणार आहे.
गेली तेवीस वर्ष या प्रश्नांचा मी पाठपुरावा करत आहे या विषयावर लोक चळवळ चालवत आहे आणि म्हणूनच पोट तिडकीने हा विषय कोकण वासियांच्यामोर मांडत आहे
संजय यादवराव
ग्लोबल कोकण